औरंगाबाद : हर्सूल परिसरातील साफल्य नगर, म्हसोबा नगरातील महिलांनी मनपावर हंडा मोर्चे काढले, आयुक्तांना घेराव घातला, थेट मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले. एवढे सारे करूनही अवघ्या १८ लाखाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. दुसरीकडे वर्षभरापूर्वी तयार झालेल्या अपार्टमेंटला मनपाने तातडीने पाणीपुरवठा केला. याचे शल्य एवढे बोचतेय की हे शहर राहण्यालायक नसल्याची प्रतिक्रिया आता रहिवाशी देत आहेत. विशेष म्हणजे उपमहापौर विजय औताडे यांच्या ऑफिस समोर आणि डोळ्यादेखत हा सारा प्रकार घडला आहे. आटपाट नगराची कहाणी या दंतकथेप्रमाणे औरंगाबाद शहराचा कारभार महानगरपालिका हाकत आहे. या महानगरपालिकेचे कारभारी अन प्रशासनातील बाहुले अशा काही सोंगट्या हलवतात की भल्याभल्यांची मती गुंग होते. शहरात पाण्याची टंचाई पाहता पैसा फेका अन पाणी मिळवा असाच प्रकार आहे. साफल्य नगर आणि म्हसोबा नगर देवगिरी केशरदीप सोसायटीतील रहिवाशांना पाण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून वनवन भटकावे लागते. या तीन कॉलनीमधील तब्बल हजार पेक्षा अधिक घरे नियमित पाणीपट्टी भरतात.आतापर्यंत हजारो रुपये मनपाला दिले मात्र थेंबभरही पाणी मिळाले नाही. या नागरिकांनी वारंवार पाण्यासाठी तीव्र संघर्ष केला हंडा मोर्चे काढले, घेराव घातला, निवेदने दिली थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रकरण गेले. शेवटी मंत्रालयातून मनपा आयुक्तांच्या नावे फर्मान आले या वसाहतींना तातडीने पाणी द्या म्हणून. बरहुकूम मनपाने कंत्राटदार नेमून 18 लाखांचे कामही मंजूर केले. उपमहापौर विजय औताडे यांनी सर्वांसमक्ष कंत्राटदाराचा सत्कारही केला. मात्र तरीही काम सुरु झाले नाही.
सोंगट्या कशा हलतात बघा...
महानगरपालिकेचा कारभार म्हणजे भल्याभल्यांना थक्क करणारा. हर्सूल टी पॉइंट वर नव्यानेच दिशा नावाची वुड्स नावाच्या अपार्टमेंट तयार झाली. साफल्यनगर, म्हसोबानगर समोरच अगदी शंभर फूट अंतरावर या अपार्टमेंट आहेत. शंभरावर फ्लॅट्स असलेल्या या अपारर्टमेंट च्या बिल्डरने साफल्य नगर म्हसोबा नगरच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारला. अवघ्या वर्षभरापूर्वी तयार झालेल्या या अपार्टमेंटला महानगरपालिकेचे पाणी मिळाले. आता या सोंगट्या कुठून आणि कशा हलल्या हे विचारू नका.
हर्सूल टी पॉइंट ऑडिटर सोसायटी हा रस्ता विजय औताडे यांनी परिश्रमपूर्वक मंजूर करून घेतला आणि आता कामही सुरू केले. अवघ्या एका वर्षात हा रस्ता बनला आहे. असे भाग्य इतर रस्त्यांचे मात्र नाही. त्याच प्रमाणे ज्या इमारती वर्षभरापूर्वी बनल्या त्यांना पाणी मिळते दहा वर्षापासून आंदोलन करणाऱ्या वसाहती अजूनही पाण्यापासून वंचित राहतात, याचे उत्तर मनपात हलणाऱ्या सोंगट्यामध्ये दडले आहे.